एक कोटी नागरिकांना पहिली मात्रा; मुंबई महानगराचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, January 5, 2022

एक कोटी नागरिकांना पहिली मात्रा; मुंबई महानगराचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण

मुंबई महानगराचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण

मुंबई : करोना प्रतिबंधात्मक लशीची पहिली मात्रा १ कोटी नागरिकांना देण्याचा महत्त्वाचा टप्पा मुंबई महानगराने गाठला आहे. या कामगिरीमध्ये मुंबईतील सर्व शासकीय, महानगरपालिका व खासगी लसीकरण केंद्रांवरील लसीकरणाचाही समावेश आहे. राष्ट्रीय स्तरावरील करोना लसीकरण मोहिमेची वर्षपूर्ती होण्याच्या आतच विक्रमी वेळेत मुंबईने ही कामगिरी केली आहे. मुंबईत आजवर लशीची पहिली आणि दुसरी अशा दोन्ही मात्रा मिळून १ कोटी ८१ लाखांपेक्षा अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. एकूण दोन कोटी मात्रांचा टप्पा गाठण्याकडे वाटचाल सुरू आहे.

 मुंबईसह देशभरात गेल्या वर्षी १६ जानेवारी २०२१ पासून करोना प्रतिबंधक राष्ट्रीय लसीकरण मोहीम सुरू झाली. टप्प्याटप्प्याने या मोहिमेची व्याप्ती वाढविण्यात आली. सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण सुरू झाले. त्यानंतर आघाडीवरील कर्मचाऱ्यांसाठी, ६० वर्षांवरील तसेच ४५ ते ५९ वयोगटातील सहव्याधी असलेल्या नागरिकांसाठी,  ४५ वर्षे वयावरील सर्व नागरिकांसाठी व  १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी अशी लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यात आली.  नुकतेच दिनांक ३ जानेवारीपासून वय वर्षे १५ ते १८ वयोगटातील नवयुवकांचेदेखील लसीकरण सुरू झाले आहे. या व्यापक लसीकरणाने आता पहिल्या मात्रेचा एक कोटीचा टप्पा पार केला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने २०२१ च्या अंदाजित लोकसंख्येच्या आधारावर सुमारे ९ लाख २२ हजार नवयुवकांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ३ जानेवारी २०२२ रोजी या वयोगटाचे लसीकरण सुरू झाले असून आतापर्यंत सुमारे १५ हजार ११० नवयुवकांनी लशीची पहिली मात्रा घेतली आहे.

 लसीकरण केंद्रावरील लसीकरणाबरोबरच विविध समाजघटकांसाठी विशेष लसीकरण, ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राइव्ह-इन लसीकरण, स्तनदा मातांसाठी, विदेशात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी अथवा नोकरी-व्यवसायासाठी जाणाऱ्यांकरिता लसीकरण राबविण्यात आले.

शारीरिक व मानसिकरीत्या दुर्बल व्यक्तींसाठी, गर्भवती महिलांसाठी आणि शासकीय ओळखपत्र नसलेल्या नागरिकांसाठीही लसीकरण हाती घेण्यात आले. वैद्यकीय कारणांनी व वयोमानाने अंथरुणास खिळून असलेल्या नागरिकांच्या घरी जाऊन लस देण्यात आली. यासोबतच, दिव्यांग व्यक्ती, आदिवासी बांधव, कारागृहांमधील बंदिवान, एलजीबीटी समुदायातील नागरिक इत्यादींसाठी विशेष केंद्र, फक्त महिलांसाठी राखीव विशेष लसीकरण सत्र, शिक्षक

आणि १८ वर्षे वयावरील विद्यार्थी यांच्यासाठी राखीव सत्र, फक्त दुसरी मात्रा देय असणाऱ्या नागरिकांसाठी राखीव सत्र अशा निरनिराळ्या उपाययोजना महानगरपालिकेने केल्या आहेत. त्यामुळे सर्वाधिक वेगाने लसीकरण करण्यात मुंबई आघाडीवर आहे.

पहिल्या मात्रेचे प्रमाण १०८ टक्के

 मुंबई महानगरात १८ वर्षांवरील नागरिकांचा विचार करता, एकूण ९२ लाख ३६ हजार ५०० मुंबईकरांना दोन्ही मात्रा देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्या तुलनेत, ९९ लाख ८० हजार ६२९ नागरिकांना पहिली मात्रा आज दुपारअखेर दिल्या गेल्या आहेत. निर्धारित लक्ष्यांकाच्या तुलनेत हे प्रमाण १०८ टक्के इतके आहे. तर दुसरी मात्रा ८८ टक्के म्हणजे ८१ लाख ३७ हजार ८५० इतक्या नागरिकांना देण्यात आल्या आहेत.  मुंबई महानगरात १५ ते १८ वर्षे वयोगटाचा विचार करता, राज्य शासनाने ६ लाख १२ हजार ४६१ नवयुवकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट नेमून दिले आहे.

The post एक कोटी नागरिकांना पहिली मात्रा; मुंबई महानगराचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/31svIzG
via

No comments:

Post Bottom Ad

Pages