करोनाग्रस्त डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या जास्त; उपचारासाठी मनुष्यबळ अपुरे
मुंबई: ओमायक्रॉनचा प्रसार शहरात झपाट्याने होत असल्यामुळे रुग्णालयांसह आरोग्य केंद्रावर कार्यरत असणारे आरोग्य कर्मचारीही मोठ्या प्रमाणात बाधित होत आहेत. परिणामी मनुष्यबळ कमी पडत असून आरोग्य यंत्रणेवरील ताणही वाढू लागला आहे.
पहिल्या लाटेच्या सुरुवातीला करोनाचा प्रसार हळूहळू वाढू लागला, तसे आरोग्य कर्मचारी मोठ्या प्रमाणात बाधित होऊ लागले. त्यामुळे सार्वजनिकच नव्हे, तर खासगी रुग्णालयांमधीलही आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली. आता तशीच स्थिती पुन्हा तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीला उद्भवली आहे. शहरातील मोठ्या रुग्णालयांमधील डॉक्टरांसह अन्य आरोग्य कर्मचारीही दिवसेंदिवस बाधित होत आहेत.
शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात तिसऱ्या लाटेमध्ये ५० निवासी डॉक्टर बाधित झाले आहेत. केईएममध्ये दिवसाला सुमारे ३५ ते ४० कर्मचारी बाधित होत आहेत. त्यामुळे प्रत्येक विभागांमध्ये सध्या मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे बाह्य रुग्ण विभागात दहा डॉक्टर पूर्वी उपस्थित असायचे तेथे आता चार डॉक्टरांवर सर्व जबाबदारी येऊन पडली आहे. नायरमध्येही आरोग्य कर्मचारी बाधित होत असून मनुष्यबळाचा काही प्रमाणात तुटवडा आहे. परंतु बहुतांश आरोग्य कर्मचारी लक्षणेविरहित असल्यामुळे सात दिवसांमध्ये पुन्हा रुजू होत आहेत. तसेच रुग्णालयातील बाधितांची रुग्णसंख्याही कमी असल्यामुळे मनुष्यबळ कमी झाले तरी बाह्यरुग्ण विभागावर थोडा फार परिणाम होतो. परंतु करोनाबाधित किंवा आपत्कालीन सेवा मात्र दिल्या जातात, असे नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.
सेवा सुरळीत ठेवण्याचे आव्हान
पहिल्या लाटेदरम्यान बहुतांश रुग्णालयांमध्ये करोनाव्यतिरिक्त इतर आजारांचे उपचार बंद झाले होते. त्यामुळे करोना रुग्णांसाठीच्या सर्व सेवा सुरू होत्या. परंतु तिसऱ्या लाटेमध्ये करोनाबाधितांचे प्रमाण वेगाने वाढत असले तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. त्यामुळे अन्य आजारांवरील उपचारांसह आपत्कालीनसह सर्व सेवा सुरू आहेत. या सर्व सेवा कमी मनुष्यबळामध्ये कशा सुरू ठेवाव्यात असे आव्हान आता रुग्णालयांसमोर निर्माण झाले आहे. लसीकरण केंद्रावरील ड़ॉक्टरांची संख्या कमी करून अन्य आवश्यक ठिकाणी हलविले आहे, अशा रितीने उपलब्ध मनुष्यबळामध्ये नियोजन सुरू असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. काही वेळा मोठ्या संख्येने बाधित झालेले आढळल्यास आपत्कालीन सेवांवर लक्ष केंद्रित करून पुढे ढकलता येणाऱ्या शस्त्रक्रिया स्थगित केल्या जातात, असेही डॉक्टरांनी सांगितले.
पाच दिवस विलगीकरण
बाधित आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी विलगीकरण कालावधी सात दिवसांचा केला आहे. तर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींनी पाच दिवसानंतर चाचणी करावी. यात करोनामुक्त असल्याचे आढळल्यास कामावर रुजू होण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत.
पदव्युत्तरचे विद्यार्थी येईपर्यंत डॉक्टरांची भरती
‘पदव्युत्तरच्या प्रथम वर्षाचे विद्यार्थी रुजू झालेले नाहीत. त्यात आरोग्य कर्मचारीही मोठ्या प्रमाणात बाधित होत आहेत. तेव्हा करोनासह इतर आरोग्य सेवांवर याचा परिणाम होऊ नये याकरिता सुमारे २५० डॉक्टरांची तात्पुरत्या स्वरुपाची भरती करण्याची जाहिरात दिली आहे. हे डॉक्टर रुजू झाल्यास कामाच ताण काही प्रमाणात कमी होईल,’ असे केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी सांगितले.
‘रुग्णालयात डॉक्टरच बाधित झाले असून इतर कर्मचारीही काही प्रमाणात आहेत. रुग्णालयात दाखल होणाऱ्या करोनाबाधितांचे प्रमाण कमी असले तरी इतर आजारांवरील उपचार सेवा सुरू आहेत. दैनंदिन बाह्यरुग्ण विभागांमध्येही नेहमीप्रमाणेच गर्दी आहे. त्यामुळे सध्या काही प्रमाणात मनुष्यबळाचा तुटवडा भासत आहे, ’- डॉ. मोहन जोशी, अधिष्ठाता, लोकमान्य टिळक रुग्णालय
‘रुग्णालयात अजून बाधितांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. परंतु याच रीतीने रुग्णसंख्या वाढल्यास निश्चितच मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. यासाठी वसतिगृह, उपाहारगृह अशा रुग्णालयातील ठिकाणी करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन काटेकोरपणे करण्याच्या सूचनाही दिलेल्या आहेत,’
-डॉ. रमेश भारमल, अधिष्ठाता, नायर रुग्णालय
The post आरोग्य यंत्रणेलाच सर्वाधिक बाधा; करोनाग्रस्त डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या जास्त; उपचारासाठी मनुष्यबळ अपुरे appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3JNv6pB
via
No comments:
Post a Comment