मुंबई: वाढते शहरीकरण, वातावरणीय बदलामुळे डासांच्या जीवनचक्रात झालेले बदल यामुळे राज्यात तीन वर्षांनंतर पुन्हा डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनियाचा उद्रेक झाला आहे. मलेरियाची रुग्णसंख्या जवळपास ६८ टक्क्यांनी वाढली आहे.
राज्यात २०१८ मध्ये मलेरियाचे १० हजार ७५७ रुग्ण आढळले होते, तर मृतांची संख्या १३ होती. मलेरिया नियंत्रणाच्या प्रयत्नांमुळे २०१९ मध्ये मात्र रुग्णांच्या संख्येत जवळपास निम्म्यापेक्षा जास्त घट होऊन चार हजार ७१ रुग्ण आढळले होते. मृतांच्या संख्येतही मोठी घट होऊन केवळ एका रुग्णाचा मृत्यू मलेरियामुळे झाला होता. २०२० मध्ये करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये आरोग्य व्यवस्थेचे लक्ष करोना नियंत्रणाकडे एकवटल्याने मलेरिया नियंत्रण कार्यक्रमाकडे दुर्लक्ष झाले. परिणामी या वर्षात पुन्हा रुग्णसंख्येत वाढ होऊन ती १२ हजार ९०९ वर गेली. मृतांच्या संख्येतही वाढ झाली असून बारा मृत्यू झाले आहेत. २०२१ मध्येदेखील मलेरियातील वाढ कायम राहिली आहे. २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये मलेरियाच्या रुग्णांमध्ये जवळपास ३९ टक्क्यांनी वाढ होत १८ हजारांचा टप्पा पार केला आहे.
डेंग्यूच्या प्रादुर्भावात चौपट वाढ
डेंग्यूचा प्रादुर्भाव मागील दोन वर्षांच्या तुलनेत जवळपास चौपटीने वाढला आहे. राज्यात २०१९ मध्ये डेंग्यूचे जवळपास २०६४ रुग्ण आढळले होते. करोनाकाळात २०२० मध्ये डेंग्यूच्या रुग्णांच्या निदानामध्ये घट झाल्यामुळे या काळातही रुग्णसंख्येत घट दिसून ती ३ हजार ३५६ होतीं. २०२१ मध्ये मात्र डेंग्यूचा उद्रेक वाढला असून रुग्णसंख्या थेट १२ हजारांवर गेली आहे. २०१८ मध्ये ११ हजार ३८ रुग्ण आढळले होते. २०१८ च्या तुलनेतदेखील २०२१ मध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे. डेंग्यूचा प्रसार वाढल्यामुळे चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्याही मागील तीन वर्षांच्या तुलनेत जवळपास दुपटीने वाढली आहे. २०१८ मध्ये चिकुनगुनियाचे १०२६ रुग्ण आढळले होते, तर २०२१ मध्ये ही संख्या २ हजार ४१२ वर गेली आहे.
गेल्या काही वर्षांत शहरीकरण वेगाने वाढत आहे. परंतु त्या तुलनेत पायाभूत सुविधांचा विस्तार झालेला नाही. परिणामी सांडपाण्याच्या निचरा होण्याच्या योग्य सुविधा नसल्यामुळे डासांची पैदास वाढते आहे.
तसेच झोपडपट्ट्यांमध्ये पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे ते मोठ्या प्रमाणात साठवून ठेवले जाते. ही ठिकाणेही डासांच्या वाढीसाठी कारणीभूत आहेत. यासह अनेक प्रकल्पांची कामे सुरू असून तेथे साचलेल्या पाण्यात डासांची वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत आहे. वातावरणीय बदलांमुळे हवेतील उष्णतेचे प्रमाणही वाढत आहे. यामुळे अंडी ते डास तयार होण्यासाठी लागणाऱ्या दिवसांमध्ये घट झाली आहे. परिणामी डासांची पैदासही वेगाने होत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी वाढत्या शहरांची नियोजनबद्ध आखणी, प्रकल्पाच्या ठिकाणी पाणी साचणार नाही या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत राज्याचे साथरोग सर्वेक्षण विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी व्यक्त केले.
राज्यात मलेरियाचा प्रादुर्भाव मुंबई, ठाणे, रायगड, गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर या सहा जिल्ह्यांमध्येच आढळतो. डेंग्यू मात्र राज्यभरात आढळत आहे. त्यामुळे मलेरिया नियंत्रणासाठी या जिल्ह्यांवर लक्ष दिले जाते. यातही जवळपास ८० टक्के रुग्ण हे मुंबई आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांमध्ये आढळतात. तरी मुंबईने गेल्या काही वर्षांत मलेरिया नियंत्रणासाठी अनेक प्रयत्न केल्यामुळे रुग्णसंख्या आणि मृतांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे डॉ. आवटे यांनी सांगितले.
The post मलेरिया, डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांत तीन वर्षांनंतर वाढ appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/31gVPtr
via
No comments:
Post a Comment