विविध माध्यमांतून उत्पन्नवाढीचे प्रयत्न
मुंबई : चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल मार्गाला तोटय़ातून बाहेर काढण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) विविध माध्यमांतून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून आता एमएमआरडीएने मोनोरेल प्रकल्पात तिकिटांशिवाय इतर माध्यमातून कसे उत्पन्न मिळवता येईल, याचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असून सल्लागाराच्या नियुक्तीसाठी एमएमआरडीएकडून नुकतीच निविदाही काढण्यात आली आहे.
चेंबूर ते जेकब सर्कल असा मुंबईतीलच नव्हे तर देशातील पहिलावहिला आणि एकमेव मोनोरेल मार्ग आहे. २ फेब्रुवारी २०१४ मध्ये या मार्गातील चेंबूर ते वडाळा हा पहिला टप्पा सुरू झाला. तर दुसरा टप्पा अर्थात चेंबूर ते जेकब सर्कल असा संपूर्ण मार्ग २०१९ सेवेत दाखल झाला.
मार्ग सेवेत दाखल झाल्यापासून आजपर्यंत या मार्गाला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने प्रकल्प तोटय़ात सुरू आहे. दिवसाला लाखोंचे नुकसान सहन करत हा मार्ग एमएमआरडीएकडून चालविला जात आहे.
या मार्गाला तोटय़ातून बाहेर काढण्यासाठी एमएमआरडीएकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. यात त्यांना यश मिळताना दिसत नाही. मात्र त्यानंतरही एमएमआरडीएचे प्रयत्न सुरूच असून त्याचाच भाग म्हणून आता थेट सल्लागाराची नियुक्ती करत उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
मार्गाचा विस्तार आणि गाडय़ांच्या संख्येत वाढ?
मोनोमध्ये तिकीट हा उत्पन्नाचा मुख्य स्रोत सध्या आहे. मुळात प्रवासी संख्याच कमी असल्याने तिकिटातून उत्पन्न वाढविणे अशक्य आहे. त्यामुळे प्रवासी संख्या वाढविण्यासाठी येत्या काळात मोनोची जेकब सर्कल ते महालक्ष्मी रेल्वे, मेट्रो स्थानकापर्यंत विस्तार करण्यासाठी चाचपणी सुरू आहे. तर मोनोगाडय़ांची संख्या वाढविण्याचेही काम सुरू आहे. असे असताना आता तिकिटाखेरीज इतर माध्यमातून उत्पन्न कसे वाढविता येईल यासाठी एमएमआरडीएने सविस्तर अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. या अभ्यासासाठी सल्लागारही नेमण्यात येणार असून यासाठी निविदा काढण्यात आल्याची माहिती महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिली.
मालमत्तांचा विकास, विक्रीचाही पर्याय
मोनोरेल स्थानक, मोनो खांब यांचा जाहिरातीसाठी कसा उपयोग करता येईल, मोनोरेल मार्गाच्या आसपास असलेल्या एमएमआरडीएच्या मालमत्ता विकून वा त्यांचा विकास करत महसूल कसा मिळवता येईल यासह अनेक बाबींचा अभ्यास सल्लागाराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या अभ्यासाच्या अहवालातील उपाययोजना प्रत्यक्षात आणत मोनोला तोटय़ातून बाहेर काढण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न असणार आहे.
The post मोनोरेलला तोटय़ातून बाहेर काढण्यासाठी आता सल्लागार appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3fl3CKh
via
No comments:
Post a Comment