दंडात्मक कारवाई करूनही बदल नाही
मुंबई : मुखपट्टीशिवाय प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांवर करोनाकाळाच्या सुरुवातीपासून दंडात्मक कारवाई करूनही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. मुखपट्टी न लावताच किंवा ती नाक आणि तोंडावर लावण्याऐवजी हनुवटीवर लावून फिरणारे प्रवासी रेल्वे आणि स्थानकांवरही सर्रास दिसत आहेत. बाजारपेठांमध्येही अशीच परिस्थिती दिसते आहे.
मुखपट्टीशिवाय रेल्वे प्रवास मुखपट्टी आणि सॅनिटायझरचा वापर करणे आदी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना यंत्रणांकडून सातत्याने दिल्या जात आहेत. दोन मात्रा घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी दिल्यानंतर गर्दीही वाढली आहे. मात्र, नियमांबाबत अद्यापही नागरिक गंभीर असल्याचे दिसत नाही. अनेक प्रवासी मुखपट्टीशिवाय लोकल प्रवास करीत आहेत. काही जण मुखपट्टी हनुवटीवर ठेऊन प्रवास करताना दिसतात, तर काही प्रवाशांची मुखपट्टी खिशात वा हातात असते. डब्यात किंवा स्थानकावरही मुखपट्टी न घालताच वावरणाऱ्यांना हटकलेही जात नाही.
रेल्वेची गर्दी वाढू लागल्यापासून डब्यात फेरीवाल्यांची वर्दळही वाढली आहे. बहुतेक फेरीवाले कोणत्याही करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करत नाहीत. त्याचबरोबर अनेकदा स्थानकावरील स्वच्छता कर्मचारी आणि प्रवाशांना नियम पाळायला लावण्याची जबाबदारी असणारे पोलीसही मुखपट्टी हनुवटीवर लावून फिरताना सर्रास दिसून येतात.
मार्शलवर नागरिकांची मुजोरी
नागरिकांची मुजोरी विनामुखपट्टी फिरणाऱ्यांवर कारवाई करणारे पालिकेचे क्लीनअप मार्शल ठिकठिकाणी दंड आकारताना दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र नागरिकांची मुजोरी त्यांना सहन करावी लागते. ‘दिवसभरात विनामुखपट्टी फिरणाऱ्या हजारो नागरिकांना आम्ही अडवतो पण त्यातले मोकजेच दंड भरतात. काही आम्हाला शिवीगाळ करतात तर काही हिसका देऊन पळून जातात,’ अशी प्रतिक्रिया दादर बाजारपेठेतील एका मार्शलने दिली. दादर स्थानाकाच्या पूर्वेस १० ते १२ तर पश्चिमेस ७ ते ८ क्लीनअप मार्शल कारवाईसाठी तैनात करण्यात आले आहेत. परंतु रोजच्या प्रवाशांना ते सवयीचे झाले असल्याने केवळ काही अंतरापुरतेच प्रवासी मुखपट्टी परिधान करतात आणि स्थानकात गेल्यावर किंवा स्थानकाच्या पूर्वपणे बाहेर पडल्यावर ती बाजूला सरकवली जाते, असे काही मार्शलनी सांगितले.
कारवाई नाममात्र
पहिल्या लाटेदरम्यान मुंबई पालिकेकडून मार्शल नियुक्त करताना मुखपट्टीविना फिरणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली जात होती. त्यानंतर रेल्वेलाही कारवाई करण्याची मुभा देऊन ५०० रुपयांपर्यंत दंड आकारणीचा अधिकार दिला. १ ते ४ जानेवारीपर्यंत मध्य रेल्वेने मुंबई विभागात स्वतंत्रपणे ८७ प्रवाशांवर कारवाई केली. डिसेंबरमध्ये १९४ प्रवाशांवर कारवाई झाली होती. पश्चिम रेल्वेने पालिकेसोबत केलेल्या संयुक्त कारवाईत ७७ प्रवासी मुखपट्टीशिवाय प्रवास करत असल्याचे आढळून आले. पश्चिम रेल्वेवर १ जानेवारीला ३२ प्रवासी, तर ४ जानेवारीला २० प्रवाशांवर दंडात्मक कारवाई झाली आहे. या दोन्ही मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लाखोंच्या घरात असून प्रवासावेळी मुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांवर होणारी कारवाई मात्र नगण्यच आहे.
दंड वसुली
मुखपट्टीचा व्यवस्थित वापर न करणाऱ्या प्रवाशांकडून मध्य रेल्वेने जानेवारी १७ हजार ५०० रुपये दंड वसुल केला आहे. तर पश्चिम रेल्वेने ८ हजार ८०० रुपये दंड वसुली केली आहे. बाजारपेठांमध्ये मुखपट्टीशिवाय गर्दी मुंबईतील दादर, माटुंगा, धारावी, परळ, लालबाग, मस्जिद बंदर, महात्मा फुले मंडई, भायखळा भाजी बाजार अशा बाजारपेठांमध्ये कायमच गजबज असते. पण याठिकाणी येणारे बहुतांशी ग्राहक तसेच विक्रेतेही सर्रास विना मुखपट्टी बसलेले आढळून आले. बाजारपेठांमधील दुकांनामध्ये अंतरनियम, निर्जंतुकीकरण द्रव्य या नियमांची सक्ती पालिकेने केली होती. परंतु काही अपवाद वगळता कोणत्याही दुकानांबाहेर निर्जंतुकीकरण द्रव्याची व्यवस्था पाहायला मिळाली नाही.
The post मुखपट्टीबाबत नागरिकांचे बेजबाबदार वर्तन; दंडात्मक कारवाई करूनही बदल नाही appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3EZknoD
via
No comments:
Post a Comment