चित्रपटगृहे सुरूच असली तरी प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबत शंका, आगाऊ नोंदणीचे दहा ते बारा कोटी प्रेक्षकांना परत करावे लागणार
मुंबई : देशभरात करोना रुग्ण वाढत असल्याने राज्यागणिक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याचा फटका पुन्हा एकदा चित्रपट उद्योगाला बसला असून आता जानेवारीत प्रदर्शित होणाऱ्या ‘आरआरआर’, ‘राधेश्याम’ आणि ‘पृथ्वीराज’ या तीन मोठ्या चित्रपटांसह जवळपास सगळ्याच चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. जानेवारीत दर आठवड्याला एक या हिशोबाने मोठे हिंदी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज होते.
राज्यात अजूनही पन्नास टक्के क्षमतेने चित्रपटगृहे सुरू आहेत. मात्र करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण पसरले आहे. डिसेंबरचा शेवटचा आठवडा उजाडेपर्यंत चित्रपटगृहांत प्रेक्षक उत्साहाने येत होते. करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यानंतर मात्र हा उत्साह मावळला आहे. अनेक कलाकारही करोनाबाधित झाले आहेत. करोनामुळे देशभरात पसरलेले चिंतेचे वातावरण आणि हरयाणा, दिल्लीसारख्या मुख्य शहरांसह अनेक राज्यांमध्ये चित्रपटगृहांवर आलेले निर्बंध लक्षात घेऊन निर्मात्यांनी जानेवारीतील चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती ट्रेड विश्लेषक अतुल मोहन यांनी दिली.
कोणत्या चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर
शाहीद कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘जर्सी’ हा चित्रपट ३१ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. या आठवड्यात ७ जानेवारीला एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित होणार होता. यशराजची निर्मिती असलेला भव्यदिव्य चित्रपट ‘पृथ्वीराज’ २१ जानेवारीला प्रदर्शित होणार होता. अक्षयकुमारची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचे प्रदर्शन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले असल्याची माहिती ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी दिली आहे. १४ जानेवारीला प्रदर्शित होणारा प्रभास आणि पूजा हेगडे
जोडीचा ‘राधेश्याम’ हा चित्रपटही पुढे गेला आहे. जॉन अब्राहमच्या ‘अटॅक’बाबत अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही, पण त्याचेही प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. नोंदणी रक्कम परत करण्याची वेळ ‘आरआरआरप् या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी यापूर्वीच १५ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. अमेरिकेतील चित्रपटगृहांमध्ये आगाऊ तिकीट विक्रीही करण्यात आली होती. आता निर्मात्यांनी या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून आगाऊ तिकीट विक्रीपोटी जमा झालेले १० ते १२ कोटी रुपयेही निर्मात्यांना परत द्यावे लागणार आहेत. वितरक आणि प्रदर्शकांना याचा खूप मोठा फटका बसणार असल्याचे अतुल मोहन यांनी स्पष्ट केले.
जानेवारीत तीनच चित्रपट
दाक्षिणात्य अभिनेता अजित आणि हुमा कुरेशी यांचा ‘वलिमाई’ हा तमिळ, तेलुगू आणि हिंदी अशा तिन्ही भाषेत प्रदर्शित होणारा चित्रपट ठरल्याप्रमाणे १३ जानेवारीला चित्रपटगृहांत येणार, असे आश्वासन निर्माते बोनी कपूर यांनी दिले आहे. त्यामुळे ‘वलिमाई’, १४ जानेवारीला प्रदर्शित होणारा ‘द किंग्ज मॅन’ आणि २८ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आलेला ‘मॉर्बियस’ हे दोन हॉलीवूडपट वगळता जानेवारीत चित्रपटगृहांकडे दाखवण्यासाठी नवीन चित्रपटच उपलब्ध नसतील, याकडेही ट्रेड विश्लेषकांनी लक्ष वेधले आहे.
The post रुग्णवाढीमुळे हिंदी चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर; चित्रपटगृहे सुरूच असली तरी प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबत शंका, आगाऊ नोंदणीचे दहा ते बारा कोटी प्रेक्षकांना परत करावे लागणार appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3F3vxbI
via
No comments:
Post a Comment