मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक वेळेवर होणार की पुढे ढकलली जाणार याचा विचार न करता महापालिका निवडणुकीच्या कामाला लागा. जिल्हा विकास योजनेतील निधीतून केलेली कामे मार्गी लावा, त्यांचा अहवाल तयार करा आणि शहरात शिवसेनेने केलेली कामे आणि निर्णय लोकांपर्यंत पोहोचवा, असा आदेश मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विभागप्रमुखांना दिला.
शिवसेनेच्या विभाग प्रमुख, खासदार, पदाधिकाऱ्यांची बैठक पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी रात्री उशिरा घेतली. परिवहनमंत्री अनिल परब, खासदार विनायक राऊत आदी नेतेही या वेळी उपस्थित होते. इतर वरिष्ठ नेत्यांनी बैठकीत मार्गदर्शन केल्यानंतर मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दहा मिनिटे दृक्-श्राव्य माध्यमातून बैठकीला उपस्थिती लावत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी पाचशे चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करातून सवलत दिली आहे. याबरोबरच गेल्या पाच वर्षांत मुंबई शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी अनेक कामे हाती घेतली व पूर्ण केली. शिवसेनेने मुंबईसाठी केलेले हे काम घराघरांपर्यंत पोहोचवा. निवडणूक कधी होणार याचा विचार न करता कामाला लागा, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. जिल्हा विकास योजनेतून विकासकामांसाठी निधी दिला. त्यातून कोणती कामे मार्गी लावली याचा अहवाल तयार करा आणि सादर करा, असेही ठाकरे यांनी सांगितले.
ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत अशीच शिवसेनेची भूमिका आहे. त्या दृष्टीने सरकारकडून आवश्यक ती प्रक्रिया पार पाडली जात आहे. अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाच्या हातात आहे, असे अनिल परब यांनी स्पष्ट केले.
विरोधकांना योग्य वेळी उत्तर
प्रकृती बरी नसल्यावरून आणि सरकारच्या कारभारावरून राज्यातील विरोधी पक्ष सातत्याने टीका करत आहे, पण त्याकडे दुर्लक्ष करा. मी योग्य वेळी त्यांचा समाचार घेईन, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला.
The post शिवसेनेने केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवा ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विभाग प्रमुखांना आदेश appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/32KFRbT
via
No comments:
Post a Comment