मुंबई: मजूर म्हणून सहकार विभागाच्या चौकशीत अपात्र ठरलेले विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबै बँकेचे संचालक व अध्यक्ष म्हणून फसवून काम केल्याचे स्पष्ट होत असल्याने त्यांच्याविरोधात भारतीय फौजदारी संहिता कलम १९९, २००, ४२० व ३७ अंतर्गत कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करणारे पत्र कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील तसेच सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना दिले आहे. सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना आपण मजूर आहात का याबाबत विचारणा करणारी नोटीस बजावली होती. याबाबत सहकार विभागाने केलेल्या चौकशीत प्रवीण दरेकर हे मजूर नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे त्यांना मजूर म्हणून अपात्र घोषित करण्याचा आदेश सहकार विभागाचे सहनिबंधक बाजीराव शिंदे यांनी ३ जानेवारी रोजी जारी केला. गेली अनेक वर्षे आमदार व विरोधी पक्षनेते असलेल्या दरेकर यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात कोटय़वधी रुपयांची मालमत्ता दिसत असून त्यांनी आपण व आपली पत्नी व्यावसायिक असल्याची नोंद केली आहे. तसेच आमदार व विरोधी पक्षनेते म्हणून दरमहा अडीच लाख रुपये मानधन मिळणारी व्यक्ती मजूर असू शकत नाही असे सहकार विभागाच्या आदेशात नमूद केले आहे. याशिवाय मजूर म्हणून त्यांनी काम केल्याचा तसेच त्यासाठी त्यांना मानधन मिळाल्याचा कोणताही पुरावा दिसत नसल्याचे आदेशात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर फसवणूक केल्याप्रकरणी दरेकर यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच सहकार कायदा कलम ७८ अ अंतर्गत मुंबै बँकेतील सदस्यत्व अपात्र घोषित केल्याच्या दिनांकापासून पुढील एक टर्मसाठी रद्द करण्याची मागणी पत्रात मलिक यांनी केली आहे.
The post दरेकरांवर गुन्हा दाखल करा! नवाब मलिक यांची मागणी appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3JNzEwb
via
No comments:
Post a Comment