‘प्रबोधन’मधील दुर्मीळ लेखांच्या संग्रहाचे १६ तारखेला प्रकाशन - Top Marathi and Hindi news, braking news, latest news

Top Marathi and Hindi news, braking news, latest news

This is a top Marathi and Hindi news site

Breaking news

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 9, 2021

‘प्रबोधन’मधील दुर्मीळ लेखांच्या संग्रहाचे १६ तारखेला प्रकाशन

मुंबई : महाराष्ट्राला विवेकवाद आणि विज्ञानातून सत्यशोधनाचा मार्ग दाखविणाऱ्या प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या ‘प्रबोधन’ या नियतकालिकामधील दुर्मीळ अशा लेखसंग्रहाचे १६ ऑक्टोबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे.

प्रबोधनकारांनी ८८ वर्षांच्या दीर्घायुष्यात आपल्या लेखणीद्वारे सामाजिक सुधारणांची चळवळच चालविली. त्यांनी आयुष्यभर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय प्रबोधन केले. हुंड्याची प्रथा, पुरोहितशाही, अस्पृश्यता, जातीयता अशा विषयांवर त्यांची लेखणी विजेसारखी कोसळत असे. ‘अंबाबाईचा नायटा’, ‘हुंड्यावर बहिष्कार’, ‘मुळशीपेटा सत्याग्रह’, ‘दरिद्री गडकरी आणि श्रीमंत जोशी’, ‘समाज-सुधारकांचे दिव्य’, ‘विद्वान नापितांच्या तुंबड्या’, ‘बुद्ध देवाची कामगिरी’, ‘आर्यांच्या विवाहविधीची चिकित्सा’, ‘मराठ्यांचा इतिहास फासावर चढला’, ‘बाजीप्रभूंचा इंग्रजी पोवाडा’, ‘ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाची चिकित्सा’, ‘जपानी राष्ट्रांचे प्रबोधन’ अशा लेखांमधून प्रबोधनकारांचे त्या त्या वेळचे भाष्य खंडात वाचायला मिळेल.

‘प्रबोधन’मधील ‘प्रबोधनकार’ या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या या तीन खंडांमध्ये प्रबोधनकारांनी १९२१ ते १९३० या काळात ‘प्रबोधन’ या आपल्या नियतकालिकात लिहिलेले लेख जाणकारांना वाचावयास मिळतील. प्रबोधनकारांचे साहित्य ‘महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा’ने पाच खंडांत प्रसिद्ध केले आहे; परंतु ‘प्रबोधन’मधील सुमारे दशकभराच्या काळातील लेखन संग्रहितरीत्या उपलब्ध नव्हते.  करोनाकाळात मुंबई, पुणे, साताऱ्यातून या अंकांचा शोध घेत यातील लेखांचा तब्बल दीड हजार पानांचा ठेवा मंडळाने वाचकांच्या भेटीला आणला आहे.

९५ पैकी ९१ अंक शोधून काढण्यात संपादक मंडळाला यश आले आहे. ‘प्रबोधन’ला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने १६ ऑक्टोबरला यातील सुमारे ५५० पानांच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन करण्यात येईल.

प्रबोधनकारांचा  तरुणपणीचा चेहरा

प्रबोधनकारांच्या बहुतांश साहित्यावर त्यांचे उतारवयातील छायाचित्र आढळून येते; परंतु या खंडांवर प्रबोधनकारांची तरुणपणाची हसरी छबी पाहावयास मिळेल. त्यांच्या एका तरुणपणीच्या छायाचित्रावरून नागपूरच्या संजय मोरे यांनी काढलेले चित्र या खंडांच्या मुखपृष्ठावर आहे. खंडाला प्रबोधनकारांचे नातू आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मराठी भाषा विभाग, उद्योग आणि खनिकर्म विभागाचे मंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री विश्वजित कदम यांचा शुभेच्छा संदेश लाभला आहे.

प्रबोधनकार ब्राह्मणेतर चळवळीचे आधारस्तंभ राहिले आहेत. बहुजनांच्या चळवळीची बुद्धिवादी मांडणी करण्याचे श्रेय त्यांना जाते. या खंडांमधून त्यांच्या शब्दांमधून ही मांडणी वाचकांसमोर येणार आहे.  – सदानंद मोरे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

The post ‘प्रबोधन’मधील दुर्मीळ लेखांच्या संग्रहाचे १६ तारखेला प्रकाशन appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3oMuZm5
via

No comments:

Post Bottom Ad

Pages