नरमाईची भूमिका घेत व्यापाऱ्यांचाही पाठिंबा
मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकऱ्यांच्या विरोधात झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आज, सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असल्या तरी सत्ताधारी पक्षांनीच आवाहन केल्याने सारे व्यवहार ठप्प होण्याची शक्यता आहे. या बंदला आधी व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला होता. मात्र, नंतर नरमाईची भूमिका घेत बंदला पाठिंबा असल्याचे व्यापाऱ्यांनी जाहीर केले.
महाराष्ट्र बंदला भाजपने विरोध दर्शवला आहे. भाजपप्रमाणेच व्यापारी संघटनांनीही बंदला विरोध दर्शविला होता. मात्र, शिवसेना बंदमध्ये सहभागी असल्याने मुंबई, ठाण्यातील व्यापाऱ्यांची कसोटी लागणार असल्याचे चित्र दिसत होते. बंदला विरोध करणार असल्याचे रविवारी सकाळी स्पष्ट करणाऱ्या मुंबईतील व्यापाऱ्यांनी रविवारी रात्री मात्र बंदला पाठिंबा देण्याची घोषणा केली. शिवसेना आणि अन्य पक्षांच्या विनंतीनुसार सोमवारी पुकारण्यात आलेल्या बंदला पाठिंबा देण्यात येत असून, सायंकाळी ४ वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शाह यांनी सांगितले.
बंदसाठी राष्ट्रवादीनेही ताकद लावल्याने पुणे, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात सारे व्यवहार ठप्प होऊ शकतात. गावागावांमधील एकही दुकान उघडे राहाता कामा नये, असे आवाहन राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.
प्रदेश काँग्रेसच्या वतीने आज, राजभवनासमोर मौनव्रत आंदोलन करण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह विविध नेते त्यात सहभागी होतील. दरम्यान, बंद यशस्वी होऊ नये म्हणून भाजपनेही विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपच्या विविध संघटना किंवा कामगार संघटनांनी व्यवहार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
एसटी, बेस्टवर परिणाम?
एसटी बसगाड्या परिस्थितीचा आढावा घेऊन आणि पोलिसांच्या मदतीनेच बाहेर काढाव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. परिवहन खाते शिवसेनेकडे असल्याने सरकारी पातळीवर बससेवा सुरळीत ठेवण्यासाठी मदत होण्याची शक्यता कमीच आहे. मुंबईत शिवसेनाप्रणीत कामगार संघटनेने बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे बेस्ट बस सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. रिक्षा आणि टॅक्सी सेवेवरही बंदचा परिणाम होऊ शकतो. मुंबई उपनगरातील वीजपुरवठ्यावर बंदच्या काळात कोणताही परिणाम होणार नाही, अशी ग्वाही अदानी इलेक्ट्रिसिटीच्या प्रवक्त्याने दिली.
The post आज ‘महाराष्ट्र बंद’ appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3loM1ER
via
No comments:
Post a Comment