मुंबई : शालेय वयात मुलांची जडणघडण होत असते. त्यामुळे मुलांसाठी शाळेचे नव्हे तर विकासाचे, भविष्याचे दार उघडले आहे. पूर्ण विचाराने, काळजीपूर्वक उघडलेले हे दार पुन्हा बंद होऊ नये यासाठी आपण एकत्रितपणे जबाबदारीने काम करू, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांना केले.
जवळपास दीड वर्षानंतर मुंबई-ठाण्यासह राज्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये सोमवारपासून पुन्हा सुरू झाली. दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी’ या कार्यक्रमाअंतर्गत सर्व शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी यांच्याशी समाजमाध्यमातून संवाद साधत शुभेच्छा दिल्या. तसेच, मुलांच्या सुरक्षिततेसाठी सगळ्यांनी दक्ष राहावे, असे आवाहन के ले.
‘सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस उत्साहाने भरलेला असतो. पण, आताची मुले कठीण, आव्हानात्मक काळातून जात आहेत. त्यांच्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेणे, आमच्यासाठी कठीण होता. परंतु करोना कृती गटांच्या सल्ल्याने अत्यंत काळजीपूर्वक आम्ही हा निर्णय घेतला आहे. शिक्षक, पालकांनी आता खबरदारी घेत शाळा चालवायच्या आहेत. एखाद्याला बरे नसेल तर तातडीने करोना चाचणी करा. ऋतुबदलानुसार इतरही आजार बळावतात. त्यामुळे सावध राहावे,’ असा सल्ला त्यांनी दिला.
शाळा मोकळ्या वातावरणात, खेळती हवा असलेल्या वर्गात भरवावी. शाळांचे निर्जंतुकीकरण करताना काळजी घ्यावी. त्यांचा अतिरेकी वापर करून मुलांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. मुलांमध्ये अंतर, मुखपट्टी, स्वच्छतालयांमध्ये स्वच्छता याबाबत दक्ष राहण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.
‘माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी’ या नव्या बोधचिन्हाचे अनावरण शालेय शिक्षण विभागाच्या वतीने यावेळी करण्यात आले. करोनाकाळात शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरू राहावे याकरिता विभागातर्फे राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
करोना कृती दलाचे मार्गदर्शक डॉ. सुहास प्रभू यांनी मुख्याध्यापक, शिक्षक, पालकांना मार्गदर्शन केले. ‘शाळा बंद राहिल्याने मुलांमध्ये अनेक मनोवैज्ञानिक समस्या उद्भवतात. त्यामुळे शाळा सुरू करण्याची हीच योग्य वेळ आहे. आम्ही सुचविलेल्या सर्व मार्गदर्शक सूचना मान्य करत शालेय शिक्षण विभागाने त्या लागू केल्या. आता शिक्षक-पालकांनीही त्यांचे योग्य पालन करत, एकमेकांच्या संपर्कात राहात आपली जबाबदारी पार पाडावी,’ अशी सूचना डॉ. प्रभू यांनी केली. शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी यांनी मुख्यमंत्र्यांसह संबंधितांचे आभार मानले.
शाळांमध्ये उत्साह, लोकप्रतिनिधींच्या शाळांना भेटी
ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे तर मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या शहरी भागांतील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू झाले. अनेक शाळांमध्ये शिक्षणोत्सव साजरा करत मोठ्या उत्साहाने विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले. काही विद्यार्थ्यांचे औक्षण केले गेले तर काही ठिकाणी गुलाबपुष्प, चॉकलेट देऊन शाळेच्या पहिल्या दिवशीप्रमाणे वातावरणनिर्मिती केली गेली. काही ठिकाणी फु ले, फु गे, रांगोळ्या काढून शाळा सजविण्यात आल्या. विद्यार्थी-शिक्षकांचा उत्साह द्विगुणित करण्याकरिता शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे आदी लोकप्रतिनिधींनी शाळांना भेटी दिल्या.
The post शाळेचे दार पुन्हा बंद होऊ नये – मुख्यमंत्री appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3oyySLC
via
No comments:
Post a Comment