बुधवारपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन
मुंबई : ओबीसी आरक्षण, आरोग्य, म्हाडा, शिक्षक पात्रता, पोलिस नोकरभरती परीक्षांमधील गैरव्यवहार, कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा, नैसर्गिक आपत्तीग्रस्त व करोनाने मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना मदत मिळालेली नाही, यासह अनेक मुद्द्यांवर विरोधक राज्य विधीमंडळाच्या बुधवारपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात आक्रमक होणार आहेत. हे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून राज्याच्या इतिहासात एवढे निरुपयोगी, निष्क्रिय आणि भ्रष्टाचारी सरकार झाले नव्हते, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन बुधवारपासून मुंबईत सुरु होत आहे. त्यात सरकारला घेरण्याची तयारी भाजपकडून करण्यात येत असून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची मंगळवारी बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे विधीमंडळ कामकाजाविषयी आणि नागपूरला हिवाळी अधिवेशन घेण्याविषयी गंभीर नाहीत, असे सांगून मुनगंटीवार म्हणाले, ओबीसी आरक्षण प्रकरणी आठ वेळा राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावण्या पुढे ढकलण्याची विनंती करुन वेळकाढूपणा करण्यात आला. त्याऐवजी शास्त्रीय सांख्यिकी तपशील (इंपिरिकल डेटा) तयार करण्याचा कालबध्द कार्यक्रम न्यायालयापुढे ठेवून काम सुरु केले असते, तर आरक्षण स्थगित झाले नसते. पण राज्य सरकार केवळ केंद्राकडे बोट दाखवीत राहिले. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असतानाही जनगणनेचा तपशील दोषपूर्ण असल्याने केंद्र सरकारने तो देण्यास नकार दिला होता.
परीक्षा गैरव्यवहारातील अनेक बाबी उघड होत असून वरिष्ठ पातळीवरील अधिकारी व नेत्यांचा पाठबळ असल्याशिवाय हे होणार नाही. राज्य सरकारमध्ये भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. करोनाने मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ५० हजार रुपयांची मदत मिळालेली नाही. अतिवृष्टीने बाधित झालेल्यांना नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. मंत्रालयात दारुच्या बाटल्यांचा खच सापडला असून कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. हे उद्धव ठाकरे यांचे ‘उध्वस्त‘ सरकार असल्याची टीका मुनगंटीवार यांनी केली.
भाजपच्या १२ आमदारांना पावसाळी अधिवेशनात निलंबित करण्यात आले होते. या निर्णयास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार देऊन पुढील सुनावणी जानेवारीत ठेवल्याने हे आमदार निलंबन मागे घेण्याची विनंती विधिमंडळास पुन्हा करणार आहेत.
The post ओबीसी आरक्षण, परीक्षा गैरव्यवहारांसह अनेक मुद्द्यांवर विरोधक आक्रमक; बुधवारपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/30KOiTr
via
No comments:
Post a Comment