मोबाइल अॅपचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई : बसप्रवासा दरम्यान सुटय़ा पैशांवरून वाहकासोबत होणारे वाद आता टळणार असून प्रवाशांना घरबसल्या तिकीट व पास काढण्याची सुविधा बेस्ट उपक्रमाने उपलब्ध करून दिली आहे. तिकीट काढण्याच्या सुविधेबरोबरच बसच्या आगमनाची नेमकी वेळ, बसण्यासाठी किंवा उभे राहण्यासाठी उपलब्ध जागा अशी माहिती देणाऱ्या ‘चलो मोबाईल अॅप’ चे लोकापर्ण पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी झाले.
बेस्टमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करीत असतात. या प्रवाशांना बेस्टचे बस आगार किंवा स्थानकात पास घेणे किंवा बसमधील वाहकांकडून तिकीट घेणे याबरोबरच आता मोबाइल तिकीट सेवेचा पर्यायही प्रवाशांना मिळणार आहे. तिकीट प्रक्रिया सोपी करण्यासाठी आणि करोनाच्या पार्श्वभूमीवर दैनंदिन रोख व्यवहार टाळण्यासाठी उपक्रमाने प्रवाशांसाठी नवीन मोबाइल तिकीट अॅप उपलब्ध करून दिले आहे. या अॅपवर एका प्रवासाचे तिकीट किंवा मासिक पास खरेदी करून त्यांचा मोबाइलवरील संकेतचिन्ह (कोड) स्कॅन करून प्रवास करू शकतील. तिकीट आणि पासचे शुल्क देण्याची सुविधा या अॅपमध्ये आहे. प्रवासाच्या वेळी प्रवाशाला या अॅपवरील तिकीट किंवा पास वाहकाला दाखवावे लागेल.
पाच वर्षांत सर्व बस विजेवर
बेस्टच्या ताफ्यात विजेवर धावणाऱ्या बस दाखल होणार असून २०२३ पर्यंत ५० टक्के बस विजेवरील असतील तर २०२७ पर्यंत सर्व गाडय़ा विजेवर धावणाऱ्याच असतील, असे ठाकरे यांनी सांगितले.
अचूक माहिती
या अॅपद्वारे प्रवाशांना बस आगमनाची अचूक माहिती मिळेल. बस नेमकी किती मिनिटे दूर आहे हे प्रवाशाला कळू शकेल. त्यानुसार थांब्यावर प्रवासी येऊ शकतील. बसमधील गर्दी, बसण्यासाठी किंवा उभे राहण्यासाठी उपलब्ध जागा देखील समजू शकेल. त्यामुळे बस थांब्यावरील गर्दी कमी होऊ शकेल. तसेच घरी बसून तिकीट काढणे, तसेच प्रवासाची वेळ निश्चित करणेही शक्य होईल. या अॅपद्वारे ७२ नवीन वेगवेगळय़ा सवलत योजनांचा लाभही प्रवाशांना मिळणार आहे. योजना एका दिवसांपासून ते ८४ दिवसांपर्यंत आणि दोन फेऱ्यांपासून १५० फेऱ्यांपर्यंत उपलब्ध आहे.
बेस्टचे स्मार्ट कार्ड
बस प्रवासात रोख रक्कमेचा व्यवहार टाळण्यासाठी मोबाईल अॅपबरोबरच स्मार्ट कार्डचेही लोकार्पण करण्यात आले. प्रत्यक्षात हे कार्ड १ जानेवारी २०२२ पासून प्रवाशांना मिळेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या कार्डच्या माध्यमातून पास व तिकीटही काढता येणार आहे. रोख रक्कम किंवा मोबाइल अॅपच्या माध्यमातून तिकीट किंवा पास काढणे शक्य नसलेले प्रवासी स्मार्ट कार्डच्या माध्यमातून पास व तिकीट काढू शकतील. कार्ड रिचार्ज करता येईल. दहा रुपयाच्या पटीत तीन हजार रुपयांपर्यंत कितीही रक्कम रिचार्ज करता येईल.
The post घरबसल्या मिळणार बेस्टचे तिकीट appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3FiP5Kr
via
No comments:
Post a Comment