मोबाइल लसीकरणाला प्राधान्य, चाचण्यांमध्ये वाढ
मुंबई : ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेऊन धारावीतील घराघरात जाऊन लसीकरणासाठी आवाहन करण्यात येत आहे. मात्र, धारावीतील उद्योग, व्यवसायात काम करणारे मजूर लसीकरणापासून लांब राहिलेला आहे. या मजुरांना कारखान्याच्या दारी जाऊन लस देण्याचा संकल्प सध्या पालिकेने सोडला आहे. त्यासाठी फिरत्या वाहनाची व्यवस्था करण्यात आली असून आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत कारखानदारांची चौकशी करून मजुरांचे लसीकरण करून घेण्यात येत आहेत.
रोजगाराच्या निमित्ताने तीन ते चार लाख परप्रांतीय मजूर धारावीत डेरेदाखल झाले आहेत. भविष्यात ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेऊन दाटीवाटीची वस्ती असलेल्या धारावीतील मजुरांचे लसीकरण प्राधान्याने होणे महत्त्वाचे आहे. मात्र येथील मजूर सुरुवातीपासून लसीकरणाबाबत उदासीन असल्याचे निदर्शनास आले आहे. मोठय़ा संख्येने मजुरांनी लस घ्यावी यासाठी फिरत्या वाहनांतील लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली असून त्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेचा एक भाग म्हणून पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील कर्मचारी कारखानदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. कारखान्यात किती मजूर आहेत. त्यापैकी किती जणांनी लस घेतली आहे, किती जण लस न घेताच काम करीत आहेत याचा आढावा कर्मचारी घेत आहेत. त्याचबरोबर लस न घेणाऱ्या मजुरांनी कारखान्यात काम करता येणार नाही, असा इशाराही कारखानदारांना देण्यात येत आहे.
धारावीमध्ये मोठय़ा प्रमाणात लसीकरण व्हावे यासाठी फिरते लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. हे वाहन केवळ सकाळीच नव्हे, तर मजुरांच्या कामाच्या वेळा लक्षात घेऊन सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळतही कार्यरत आहे. या वाहनाच्या माध्यमातून दर दिवशी सुमारे १५० ते २०० नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. या मोहीम १८ ऑक्टोबर रोजी सुरू झाली. परंतु गेल्या महिन्याभरात या मोहिमेने वेग घेतला आहे. आतापर्यंत या गाडीचे धारावीत ३२ लसीकरण दौरे झाले असून ५,९९४ जणांनी लस घेतली आहे. उर्वरित दौरे जी उत्तर विभागातील इतर ठिकाणी झाले आहेत.
फिरते लसीकरण केंद्र कोणत्या भागात, कोणत्या वेळी जाणार याचे वेळापत्रक सात दिवस आधीच तयार करण्यात येते. त्यानुसार तेथील नागरिकांना पूर्वसूचना देण्यात येते. ध्वनिक्षेपकावरून घोषणा करण्यात येते. मोठय़ा संख्येने मजूर आणि लसीकरण न झालेले नागरिक लस घेण्यासाठी येतील याची काळजी घेऊन डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी मेहनत घेत आहेत, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
धारावीतील प्रत्येक नागरिकाचा लसीकरण अहवाल आमच्याकडे आहे. ज्यांची पहिली मात्रा झाली, त्यांना दुसऱ्या मात्रेसाठी आवर्जून बोलावले जात आहे. ज्यांचे लसीकरण झाले नाही त्यांना महत्त्व पटवून दिले जात आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पुन्हा चाचण्याचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. लसीकरणाबरोबच करोना चाचण्या करण्यासाठी फिरत्या वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. एखादा रुग्ण करोनाबाधित आढळय़ास त्या ठिकाणी ही गाडी पाठवून रुग्णाच्या संपर्कातील सर्वाच्या चाचण्या केल्या जात आहेत.
किरण दिघावकर, सहाय्यक आयुक्त, जी उत्तर
The post धारावीत मजुरांना लससक्ती appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/30MWSRw
via
No comments:
Post a Comment