उरलेसुरले ग्राहकही कंटाळून सेवा बंद करण्याच्या तयारीत
मुंबई : मोबाइलच्या सर्वदूर प्रसारामुळे अतिशय कमी ग्राहकसंख्येपुरती मर्यादित उरलेली महानगर दूरसंचार निगमची (एमटीएनएल) सेवा त्यांच्यासाठीही तापदायक ठरू लागली आहे. एकीकडे दूरसंपर्काच्या अन्य पर्यायांमुळे ग्राहक एमटीएनएलची सेवा रद्द करत असताना एमटीएनएलच्या सेवेबाबतच्या तक्रारींचे निवारण वेळेत न होणे, हेही ग्राहक तुटण्याचे कारण ठरत आहे. बंद केलेल्या सेवेची अनामत रक्कम परत न मिळणे, बंद पडलेल्या सेवेचे निराकरण करण्याकडे दुर्लक्ष करणे, तक्रारींच्या निवारणासाठी अधिकारीवर्गच उपलब्ध नसणे अशा अनेक तक्रारींमुळे ग्राहक हतबल होऊ लागले असून अनेकांनी ‘एमटीएनएल’ला सोडचिठ्ठी देण्यास सुरुवात केली आहे.
प्रत्येकाच्या हातात भ्रमणध्वनी आला असला तरी काहींनी एमटीएनएलची जुनी दूरध्वनी सेवा आजही सुरू ठेवली आहे. तर काही व्यवसायिकांना व्यवसायामुळे ही सेवा कार्यान्वित ठेवावी लागली आहे. मात्र या ग्राहकांना एमटीएनएलच्या निकृष्ट सेवेमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. आम्ही ‘एमटीएनएल’ची सेवा बंद करतो, पण किमान आमची अनामत रक्कम तरी परत करा अशी व्यथा बोरिवली येथील ७५ वर्षीय शुभा काकिर्डे यांनी व्यक्त केली.
‘करोनाकाळापासूनच आमची दूरध्वनी सेवा बंद झाली. वारंवार तक्रारी करूनही सेवा सुरळीत झालेली नाही. कधी कर्मचारी नाही, तर कधी निराळेच कारण दिले जाते. असे असले तरी दूरध्वनीचे देयक मात्र न चुकता येत होते. सहा महिने या त्रासाला कंटाळून शेवटी आम्ही एमटीएनएलची दूरध्वनी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. सेवा बंद केल्यानंतर कर्मचारी दूरध्वनी उपकरण घेऊन गेले, पण आज वर्ष उलटून गेले तरी अनामत रक्कम परत मिळालेली नाही. अनामत रकमेसाठी एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात खेटे घालायला भाग पडण्यात येत आहे. आमच्या विभागातील अनेक ग्राहक ‘एमटीएनएल’च्या सेवेला वैतागले आहेत,’ असे त्या म्हणाल्या.
व्यावसायिकांचीही हीच अवस्था आहे. किंबहुना एमटीएनएलच्या संपर्क क्रमांकावर कित्येक वर्षे व्यवसाय करणारे व्यावसायिक अधिक त्रासले आहेत. ‘दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा दोन्ही बंद पडल्याने व्यवसायात अनेक अडचणी येत होत्या. शक्य तितक्या ग्राहकांना, व्यापाऱ्यांना आम्ही वैयक्तिक संपर्क क्रमांक दिले असले तरी आजही अनेक ग्राहक जुन्याच क्रमांकावर संपर्क साधतात.
सुरुवातीला ऑनलाइन तक्रार नोंदवली, परंतु तक्रार क्रमांक मिळण्यापलीकडे त्याचे काहीही झाले नाही. मग दादरच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेट दिली, तर एकही अधिकारी उत्तर द्यायला तयार नव्हता. एका अधिकाऱ्याने उलट उत्तर दिल्याने वाद झाल्याचे दादर येथील व्यावसायिक कारण शाह यांनी सांगितले. दादर बाजारात अनेक व्यापारी ‘एमटीएनएल’च्या एकूणच सेवेबाबत नाराज असल्याचेही त्यांनी नमूद केले. हीच स्थिती मुंबईतील अन्य ग्राहकांची असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात एमटीएनएल प्रशासनाशी संपर्क साधला असता तो होऊ शकलेला नाही.
The post महानगर टेलिफोन तक्रार निवारणात ढिम्मच appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3stXY00
via
No comments:
Post a Comment