वाढत्या रुग्णसंख्येसाठी जानेवारीपासून पूर्ण कार्यान्वित करण्याच्या सूचना
मुंबई : करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने मुंबई महापालिकेने शहरातील जम्बो करोना केंद्रे १ जानेवारीपासून पूर्णपणे कार्यरत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आवश्यक मनुष्यबळ, औषधांचा साठा, प्राणवायू आदी आवश्यक बाबींची तयारी करण्याची सूचना पालिकेने या केंद्रांना दिल्या आहेत. मुंबईत गुरुवारी नव्याने आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येने सहाशेचा टप्पा पार केल्यामुळे पुन्हा चिंता वाढली आहे. गेल्या आठवडाभरात मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्याही वाढली आहे. तसेच बाधितांचे प्रमाणही जवळपास दीड टक्क्यावर गेले आहे. वाढती रुग्णसंख्या आणि नाताळ, नववर्ष स्वागतासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन येत्या काळात आणखी रुग्णसंख्या वाढण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून कमी खाटांसह सुरू ठेवलेले जम्बो करोना केंद्र पूर्णपणे कार्यरत करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत.
‘पालिकेने २५०० खाटा कार्यरत करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी आवश्यक मनुष्यबळ कंत्राटी तत्त्वावर घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार आधी कार्यरत असलेल्यांची यादी आमच्याकडे उपलब्ध असून फोनद्वारे संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले जात आहे. केंद्र पूर्णपणे कार्यरत करण्यासाठी सुमारे २५० परिचारिका आणि १५० डॉक्टरांची आवश्यकता आहे,’ अशी माहिती वांद्रे-कुर्ला संकुलातील जम्बो करोना केंद्राचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे यांनी दिली. गोरेगावचे नेस्को करोना केंद्रामध्ये आत्तापर्यंत ८८० खाटा कार्यरत होत्या. त्यानुसार मनुष्यबळही उपलब्ध आहे; परंतु आता आणखी जवळपास अकराशे खाटा हळूहळू कार्यरत करण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक मनुष्यबळही टप्प्याटप्प्याने घेतले जाईल, असे नेस्कोच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी सांगितले.
भायखळा येथील रिचर्डसन अॅण्ड क्रुडास करोना केंद्र गेल्या काही दिवसांपासून केवळ आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या विलगीकरणासाठी खुले ठेवले होते. आता रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे १ जानेवारीपासून करोनाबाधितांच्या उपचारासाठी ७०० खाटा आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या विलगीकरणासाठी ३०० खाटा कार्यरत ठेवण्यात येणार आहे. यासाठी आणखी डॉक्टर आणि परिचारिकांना सेवेत घेतले जाईल. तसेच आतापर्यंत उपचार केंद्र फारसे कार्यरत नसल्यामुळे औषधांचा साठाही कमी आहे. आवश्यक औषधांच्या साठय़ाची यादीही तयार केली जात असून ही उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे या केंद्राचे अधिष्ठाता डॉ. दुस्सा यांनी सांगितले.
मनुष्यबळ उभे करण्याचे आव्हान
ऑक्टोबरनंतर शहरातील करोनाबाधितांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली. नोव्हेंबरमध्ये तर ८० टक्क्यांहून अधिक खाटा रिक्त होत्या. त्यामुळे पालिकेने जम्बो करोना केंद्रातील आवश्यक रुग्णशय्या कार्यरत ठेवून इतर विभाग बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच रुग्णसंख्येनुसार एक किंवा दोन विभागांमध्ये सर्व रुग्ण एकत्रित ठेवून अनावश्यक विभागही बंद करण्यास सांगितले होते. उपलब्ध रुग्णसंख्येनुसार मनुष्यबळ ठेवून अन्य कंत्राटी मनुष्यबळ कमी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार केंद्रांनी ऑक्टोबरपासून कर्मचाऱ्यांच्या संपत आलेल्या कंत्राटांचे नूतनीकरण केले नाही आणि आवश्यक तेवढेच मनुष्यबळ कार्यरत ठेवले होते. मात्र आता पुन्हा ही केंद्रे कार्यरत करण्यात येणार असल्याने आवश्यक मनुष्यबळ उभे करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
‘जानेवारीपर्यंत टप्प्याटप्प्याने शहरातील बीकेसी, नेस्को, भायखळय़ाच्या रिचर्डनस अॅण्ड क्रुडास आणि मुलुंडचे जम्बो करोना केंद्र पूर्णपणे कार्यरत करण्यास सांगितले. रुग्णसंख्या वाढ व या केंद्रांमधील व्यापलेल्या खाटा यांचा आढावा घेऊन अन्य पाच जम्बो केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल.’
– सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका
The post जम्बो करोना केंद्रे सज्ज करा! appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3po5qYD
via
No comments:
Post a Comment