कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्प
मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने पुनर्विकासाअंतर्गत दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा परिसराचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे. कामाठीपुऱ्याचा सहा टप्प्यात पुनर्विकास करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. तर मार्चमध्ये या प्रकल्पासाठीचे इरादा पत्र / आशय पत्र जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करून प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्याचा दुरुस्ती मंडळाचा विचार आहे. मात्र या प्रकल्पाचा व्यवहार्यता अभ्यास आणि सर्वेक्षण अहवाल अद्याप मंडळाला प्राप्त झालेला नाही. त्यामुळे कामाठीपुऱ्याच्या पुनर्विकासाला विलंब होण्याची शक्यता आहे.
कामाठीपुरा परिसरात गल्ली क्रमांक १ ते १५ मध्ये सुमारे ९४३ इमारतींचा समावेश आहे. या इमारतींमध्ये आठ हजार ३४४ भाडेकरू वास्तव्यास आहेत. या सर्व इमारती १०० वर्षे जुन्या असून त्या धोकादायक अवस्थेत आहेत. त्यामुळे या इमारतींचा पुनर्विकास होणे गरजेचे आहे. मात्र, यातील बहुतांश इमारती अरुंद भूखंडावर उभ्या असल्याने त्यांचा स्वतंत्र पुनर्विकास करणे अशक्यप्राय बाब आहे. त्यामुळे या इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. या पार्श्वभूमीवर येथील इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी म्हाडाच्या दुरुस्ती मंडळाने पुढाकार घेतला आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी १७ फेब्रुवारी २०२० रोजी या परिसराची पाहणी केली आणि म्हाडाने समूह पुनर्विकासाअंतर्गत हा प्रकल्प मार्गी लावावा असे आदेश दिले होते. कामाठीपुऱ्यासाठी समूह पुनर्विकास हा एकमेव पर्याय असल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट करीत त्यादृष्टीने आदेश दिले होते.
या आदेशानंतर दुरुस्ती मंडळ कामाला लागले. कामाठीपुराच्या ९४३ इमारतीसह ३४९ विनाउपकरप्राप्त इमारतींचा असा एकत्रित पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मेसर्स जी. एम. रेडेकर अॅण्ड असोसिएटस या कंपनीची नियुक्ती करून त्यांच्यावर येथे किती निवासी/अनिवासी इमारती आहेत, त्यात किती रहिवासी राहतात, अन्य इमारती किती आहेत, अन्य कोणतीही बांधकामे आहेत याचे सर्वेक्षण करून एक अहवाल सादर करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर प्रकल्पाच्या व्यवहार्यता अभ्यासही हीच कंपनी करीत आहे. कंपनीने हे काम सुरू केले असून आतापर्यंत अहवाल सादर होणे अपेक्षित होते. मात्र अजूनही अहवाल सादर झालेला नाही, अशी माहिती दुरुस्ती मंडळातील एका अधिकाऱ्याने दिली.
विलंबाची कारणे..
कामाठीपुरा पुनर्विकासासाठीच्या अहवालाबरोबरच दुरुस्ती राज्य सरकारला सादर केलेल्या एका प्रस्तावाची मंडळाला प्रतीक्षा आहे. दक्षिण मुंबईतील पुनर्विकास समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी मंडळाने यासंबंधीचा एक प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला असून प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. या प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर कामाठीपुराचेही काम मार्गी लावणे सोपे होणार आहे. त्यामुळे या प्रस्तावाच्या मंजुरीचीही प्रतीक्षा असल्याची माहितीही मंडळातील अधिकाऱ्याने दिली.
भाडेकरूंना ५०० चौ फुटांची घरे
कामाठीपुराचा पुनर्विकास सहा टप्प्यात करण्यात येणार आहे. कामाठीपुराच्या ९४३ इमारती, ३४९ विना उपकरप्राप्त इमारतींसह १४ धार्मिक स्थळे, २ शाळा, ४ आरक्षित भूखंड आणि म्हाडाच्या ११ पुनर्वसित इमारती यांचा समावेश असलेल्या कामाठीपुराच्या परिसराचा समूह पुनर्विकास करण्यात येणार आहे. या पुनर्विकासाअंतर्गत आठ हजार ३४४ भाडेकरूंना ५०० चौरस फुटांचे घर मिळण्याची शक्यता आहे. तर म्हाडालाही मोठय़ा संख्येने अतिरिक्त घरे उपलब्ध होणार आहेत.
The post मार्चपर्यंत इरादापत्र देण्याचा म्हाडाचा प्रयत्न appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3J9wOS0
via
No comments:
Post a Comment